मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – समाजात वावरत असताना कवी आजुबाजूला पाहतो .” कवी निरीक्षण करतो काही प्रसंग, घटना किंवा दृश्य पाहून तो प्रभावित होतो. विचार करतो अभिव्यक्त होतो. अभिव्यक्त होताना आपल्या वेचक शब्दांमधून कवितेतून एक संदेश देण्याचा प्रयत्न कवी करतो. कवितेतील हा संदेश वाचकाच्या मनावर प्रभाव सोडतो.” असे उद्गार डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांनी कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील आठव्या मासिक ऑनलाईन कविसंमेलन प्रसंगी काढले. विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांपैकी एक “कवितांजली” अंतर्गत तिसर्या पर्वातील आठवे ऑनलाईन कविसंमेलन 17 जानेवारी रोजी संपन्न झाले. भवन विकासक, मिरा भाईंदर भूषण २०१९ या पुरस्काराचे मानकरी श्रीपत मोरे , उद्योजक शंकर जंगम , लायन दीपक मोरे,अॅड. अभिजित मोरे , प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका वसुंधरा शिवणेकर आणि कवितांजली कार्यक्रमाचे संप्रेरक व अध्यक्ष डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर हे मान्यवर कविसंमेलनासाठी ऑनलाईन उपस्थित होते.
कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संमेलनाची सुरुवात आपल्या “बर्याच गोष्टी ” या कवितेच्या सादरीकरणाने केली. ग्वाल्हेर, बेंगलोर, अमरावती, बार्शी, सोलापूर, इचलकरंजी, पुणे, ठाणे,विरार ,पालघर आणि मुंबई परिसरातील पंचवीस कवी सहभागी झाले.काळाच्या ओघात जीवनपद्धती कशी बदलत चालली आहे, बदलती मूल्ये आणि आकर्षण ,पर्यावरण आणि आध्यात्म विषयक, प्रेम, सौंदर्य , सुख दु:ख विषयक आर्त भावना व्यक्त करणाऱ्या गेय तसेच मुक्त छंदातील भावस्पर्शी व आशावादी आनंददायी रचना कवींनी सादर केल्या. सहभागी कवींना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कविसंमेलनाचे संयोजन विजय म्हामुणकर व वसुंधरा शिवणेकर यांनी परिश्रमपूर्वक सूत्रबद्ध केले.तसेच प्रसाद गाळवणकर यांनी तांत्रिक सहाय्य देऊन श्रवणीय तसेच सुंदर प्रेक्षणीय केले. विजय म्हामुणकर यांनी सूत्रसंचालन केले. सर्वांचे आभार मानून मकर संक्रांतीनिमित्त कवितांजलीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. शेवटी पुढील कविसंमेलन 21 फेब्रुवारी, 2021 रोजी होईल. त्यासाठी विषयाचे बंधन नाही असे घोषित करण्यात आले.
सहभागी कवी : डाॅ.लक्ष्मण शिवणेकर, अनंत जोशी, विजय म्हामुणकर,लक्ष्मण शेडगे,अॅड. सुलभा गोगरकर , विशाल कुलकर्णी, स्नेहा साळुंके , संध्या बनकर, पद्मा बांडे, स्वाती गोखले, शामराव सुतार , किशोरी पाटील, सरोज गाजरे , चंद्रशेखर धर्माधिकारी, दया घोंगे, सुनंदा सोनार, मधुरा खाडे, भाग्यश्री कुलकर्णी, इंद्रजीत पाटील,सुनिल शिरसाट,नदाफ दस्तगीर, वैजयंतीमाला मदने, हरी धारकर,विठ्ठल घाडी . शेवटी कविता संमेलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कृपया अधिक माहितीसाठी डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर अध्यक्ष, कवितांजली भाईंदर (पूर्व) यांच्या 9869148418 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.







