गुटुंर (आंध्रप्रदेश) – देशभरात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 16 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. मात्र हे लसीकरण सुरू असतानाच आंध्र प्रदेशमधून एक चिंताजनक बातमी आली आहे. कोरोनाची लस घेतलेल्या एका आशा कार्यकर्तीचा मृत्यू झाला आहे.
विजया लक्ष्मी (42) असे त्या महिलेचे नाव असून तिला 19 जानेवारी रोजी लस टोचण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती बिघडली. तिला अस्वस्थ वाटत होते. त्याच परिस्थितीत तीने दोन दिवस काढले व 21 जानेवारीला तिला गुंटूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान केले होते. दरम्यान रविवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तिच्या कुटुंबीयांना कोरोनाच्या लसीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सॅम्युअल आनंद कुमार यांनी विजया यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विजया यांच्या मुलाला नोकरी, घर व नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे मान्य केले आहे.







