खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – गगाखेड तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील एका व्यक्तीने खासगी कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा संदीप भिसे यांनी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर रात्री उशिरा चौघांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील रामेश्वर दत्तराव भिसे (वय – 51) यांनी सोमवारी दुपारी परभणी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या मागील शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा मुलगा संदिप रामेश्वर भिसे याने शेत शेजारी अनिल राठोड यांच्या मदतीने दुचाकीवरून त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. जमादार रंगनाथ देवकर, पोलीस नायक एकनाथ आळसे यांनी रुग्णालयात पंचनामा केला.
भिसे यांच्या खिशात दोन चिठ्ठया आढळून आल्या. त्यात कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी संदीप रामेश्वर भिसे यांनी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात ताक्रार दिली. यावरून बाबासाहेब बापूराव कांबळे, लिंबाजी कबाजी उर्फ कबीर भिसे (दोघे रा. पिंप्री, झोला), आदेश अजय रुद्रवार व वैभव अजय रुद्रवार (दोघे रा. गंगाखेड) अशा चौघांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि विकास कोकाटे हे करीत आहेत.







