नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

nana-patole

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नाना पटोले विदर्भातून येतात. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

नाना पटोले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पण विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये बदल करत सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेऊन, विधानसभेचे कामकाज चालवले. नाना पटोले यांनी बुधवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. आज सकाळी ते महाराष्ट्रात परतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही असे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेलं नाही. पक्ष आदेश देईल. त्याचं मी पालन करेन” असे नाना पटोले म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार ? या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा निर्णय तीन पक्षाचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख या संदर्भात बैठक करुन, निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळातच होते” असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here