केरळ – विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये एनडीएतील घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जन सेना पक्षात फूट पडली आहे. या पक्षातील बंडखेर नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये (यूडीएफ) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय जनसेना नावाच्या नवीन पक्षाच्या स्थापनेची घेषणाही त्यांनी केली आहे. भाजपने निवडणुकीसाठी सत्ताधारी एलडीएफसोबत गुप्त करार केल्याचा आरोपही बंडखोर नेत्यांनी केला आहे.
सबरीमला मंदिरप्रवेशाच्या मुद्द्यावरून या पक्षात फूट पडली आहे. एलडीएफ सरकारने सबरीमला मंदिरात मासिक धर्म असेलल्या महिलांना प्रवेशाची परवानगी देत हिंदुच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप बंडखोर नेते व्ही. गोपीकुमार यांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हिंदुच्या भावना दुखावल्याने पक्ष सोडत असून नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
मंदिरात महिलांना प्रवेशाविरोधात भारत धर्म जन सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांसह हजारो भाविकांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. भाजप त्यांचा काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचा एजेंडा राबवण्यासाठी केरळ विधानसभा निवडणुकीत पुन्हा एलडीएफला सत्तेत आणण्याची योजना आखत आहे. भाजपने त्यासाठी एलडीएफशी गुप्त करार केल्याचा आरोपही गोपीकुमार यांनी केला आहे. मात्र, राज्यातील हिंदूना भाजपचे षडयंत्र समजले असून ते राज्यात पुन्हा एलडीएफच्या सरकारला सत्तेत येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपच्या या कारस्थानामुळे आम्ही आता एनडीएत राहू इच्छित नाही. त्यामुळे भारतीय जनसेना नावाचा नवा पक्ष स्थापन करून यूडीएफसोबत जाणार असल्याचे गोपीकुमार यांनी स्पष्ट केले. भाजपने राजकीय स्वार्थासाठी भारत धर्म जनसेना पक्षाचा वापर केला आहे. त्यामुळे आम्ही वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेसाठी भाजप हिंदूना धोका देत असल्याचा आरोपही गोपीकुमार यांनी केला आहे.
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या भारतधर्म जनसेना पक्षात सबरीमलाच्या मुद्द्यावरून फूट पडली आहे. त्यामुळे केरळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.







