सोनाली साकारणार छत्रपती ताराराणी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – छत्रपती महाराणी ताराबाई भोसले… मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली.

त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी लीलया पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जाधव दिग्दर्शित ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका सोनाली साकारणार आहे. क्रिएटिव्ह मदारी प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून त्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here