मेरठ (उत्तरप्रदेश) – सध्या सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ लग्नसमारंभातील असून, याठिकाणी चपात्या बनवित असताना त्या चपात्यांना थुंकी लावणारा आचारी दिसून येत आहे. हा व्हिडीओ मेरठमधील लग्न समारंभाचा आहे. तो व्हायरल झाल्यावर हिंदू जागरण मंच संस्थेने याचा निषेध करत मेरठच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत थुंकी लावून चपात्या बनवणारा आरोपी सोहेलला अटक केली आहे.
लग्न समारंभासाठी चपात्या बनवताना सोहेल त्यावर थुंकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ 1 मिनीटे 5 सेंकदांचा आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या घटनेचा हिंदू जागरण मंचने निषेध केला आहे. ही घटना मेरठच्या आरोमा गार्डन येथील लग्न समारंभातील असल्याचे संस्थेने म्हटले आहे. तसेच या विरोधात मेरठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
हिंदू जागरण मंचचे शहर अध्यक्ष सचिन सिरोही कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी चपात्या बनवणाऱ्या सोहेल विरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक करण्याची मागणी केली. आपल्याला मोबाईलवर हा व्हिडीओ आल्यानंतर त्याची तपासणी केली. सोशल मिडीयावरही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे याविरोधात कारवाई करण्याची मागणी सिरोही यांनी केली.
हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे, याची सुरुवातीला माहिती मिळाली नाही. मात्र, हा व्हिडीओ मेरठमधील असल्याचा आणि आरोपीचे नाव सोहेल असल्याचा दावा सिरोही यांनी केला. त्याचा तपास केल्यावर दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे सोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंदू जागरण मंच या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. या घटनेची दाखल घेत शहरात लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी स्वंयपाक घरात सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याची मागणी संस्थेने केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सिरोही यांनी केली आहे.






