शिरसोली येथे विवाहानंतर नवरदेवासह नातेवाईकांना झाली कोरोनाची बाधा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) ­- शिरसोली प्र. बो. मध्ये विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह वडील, भाऊ, भावजाई आणि अन्य एक नातेवाईक असे लग्नघरातील पाच जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.शिरसोलीत दोनच दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जळगावात १६ फेब्रुवारीला पुणे येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या व मूळ शिरसोली गावातील राहिवासी असलेल्या एका तरुणाचा विवाह जळगावातील तरुणीशी झाला. विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह नातेवाईकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता, पाच जण बाधित आढळून आले आहेत.

या लग्नात किमान दोनशे ते तिनशे लोकांनी उपस्थिती दिली होती. याच गर्दीतून कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लग्न झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले आहे. विवाह समारंभ मोजक्या व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला अनेक नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सोहळ्यांना मर्यादित लोकांची उपस्थिती या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची निकड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here