मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडले आहेत. सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. काही शहरात तर पेट्रोलने शंभरीचा आकडला पार केला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने आता मोदी सरकारला लक्ष करण्यास सुरवात केली आहे. इंधन दरवाढीवरुन शिवसेने मोदी सरकारवर टिकेचे बाण सोडले आहेत. जीवनाश्यक वस्तूचे भाव नियंत्रणात ठेवणे हे सरकारचे काम आहे. केंद्रातील सरकार यावर नियंत्रण ठेवताना दिसून येत नाही.
राम मंदिरासाठी देशभरातून कोट्यावधी रुपयांची वसूली सुरु आहे. मात्र दुसरीकडे इंधनाचे दर काही कमी होत नाहीत. या वसूलीतून रामभक्तांच्या चुली पेटतील पण सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे त्याचे काय? देशातील जनतेने वाहने खरेदी केली ती नोकरी-धंद्यासाठी. एक दिवस नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर सोडून घरी जावे लागेल. अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून मोदी सरकारवर टिका करण्यात आली आहे.
देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने पुरते हैराण करुन सोडले आहे. या महागाईवर राज्यातील विरोधीपक्ष काहीही बोलण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असल्या तरी देशात मात्र इंधनाच्या दराने शंभरी गाठली आहे. २०१४ ला १०८ डॉलर्स प्रति बॅरल कच्च्या तेलाचे भाव होते. आणि आज फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाची किंमत ६२ प्रती बॅरल डॉलर्स आहे. तरी सुद्धा पेट्रोलने देशात शंभरी गाठली आहे. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याचा फायदा देशातील जनतेला मिळाला पाहिजे. मात्र तो मिळत नाही आहे.






