मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – केंद्र सरकारने संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देण्यात निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रासह मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध पातळीवर काम सुरु असले तरी दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत असलेल्या संख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती येणार का? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. जर रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली नाही, तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे.
मुंबईत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळून आले आहे. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत बुधवारी ११०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले. त्यापैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
गेल्या आठवड्यातील डाटाचे विश्लेषण केले तर ७८ ते ८२ टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे आढळून आले आहे. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. राज्यातील ७८ टक्के रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर मुंबईत हिच संख्या ४९ टक्के इतकी आहे.
मुंबईत घराच्या बाहेर फिरताना मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत ११६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी अचानक मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत असताना ही आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी मुंबईत ६४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.






