मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मुंबईच्या विविध प्रवेश द्वारावर जकात नाके उभारण्यात आले होते. त्याचा आता व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. वस्तू आणि सेवाकरांची अर्थात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर हे जकात नाके जुलै २०१७ पासून ओस पडलेले आहेत. या जाग्यांचा व्यावसायिक वापर करता येवू शकतो का? असा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. त्यानंतर आता पालिकेच्या सल्लागार समितीकडून अहवाल मागवण्यात आला आहे. मुंबईच्या दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी, मानखुर्द अशा एकूण पाच जकात नाक्यांच्या १६ एकर जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हब उभारण्याचा पालिकेचा विचार आहे.
मुंबईतील या पाच जकात नाक्यावरील मोकळ्या जागेचे रुपांतर व्यावसायिक जागेमध्ये झाले तर पालिकेला मोठा महसूल मिळू शकणार आहे. या जागेवर वाहतूक हब उभे केल्यास मुंबईच्या बाहेरुन येणाऱ्या प्रवासी गाड्या तिथेच थांबवण्यात येणार आहेत. आणि ट्रक टर्मिनलही उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या मुंबईत काही ठराविक ठिकाणी उभ्या असतात. प्रवाशांच्या प्रतिक्षेत या गाड्या अर्धा-अर्धा तास रस्ता अडवून धरतात. त्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेचं या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नसतात. त्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मात्र जकात नाक्यावर हब बनवण्यात आले तर हा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील या नाक्यांवर जर व्यावसायिक हब बनवण्यात आले तर त्यातून किती महसुल पालिकेला मिळू शकेल यावर सध्या विचार विनिमय सुरु आहे. आणि सल्लागाराकडून याचा आर्थिक आराखडा मागविण्यात आला आहे. मुंबईतील पाच जकात नाक्यांसाठी मागवण्यात आलेल्या आराखड्यातून पालिकेची समिती योग्य निर्णय घेवून, यातील योग्य त्या आराखड्याची निवड करले आणि त्यानुसार हे काम सल्लागाराला देण्यात येईल, असं पालिकेचे वास्तूविशारद सुरेंद्र बोराळे यांनी सांगितले आहे.






