भोसला मिलीटरी स्कुलचे सहा विद्यार्थी करोनाबाधित

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – शहरात करोना संसर्ग वाढत असुन दररोज सुमारे 40 ते 50 नवीन रुग्णांची भर पडत असल्याने महापालिकेची यंत्रणा संतर्क झालेली असतांना आज शहरातील गंगापूररोड भागातील भोसला मिलीटरी स्कुलमधील 6 विद्यार्थी करोना बाधीत आढळून आले आहेत.

त्यांच्या संपर्कातील 51 विद्यार्थी – शिक्षकांना शाळेच्या वसतीगृहात होम कोरंटाईन करण्यात आले असुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहे. यामुळे शहरात गर्दी, सभारंभातून करोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसात दररोज नवीन 40 ते 50 करोना रुग्णांची भर पडत असुन शहरात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज 1719 पर्यत पोहचली आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी शहरात रुग्णालयात उपचार घेणार्‍या करोना बाधीत रुग्णांचा आकडा 1033 इतका असतांना गेल्या पाच दिवसात यात 686 ने वाढला आहे. यामुळे महापालिका यंत्रणा करोना प्रादुर्भाव रोकण्याबरोबर उपचाराची यंत्रणा सज्ज झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार 28 फेब्रुवारी पर्यत शहरातील सर्वच खाजगी रुग्णालयात 80 टक्के खाटा करोनासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या असुन आता करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन शासनाकडुन ही मुदत वाढविण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात पालकमंत्री भुजबळ यांनी गर्दीच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते करोना बाधीत झाले होते. त्यांच्या संपर्कातील 60 पैकी 11 जण पॉझिटीव्ह निघाले होते. आता असाच प्रकार शहरातील गंगापूर रोड भागातील भोसला मिलीटरी स्कुल मध्ये समोर आला असुन याठिकाणी वसतीगृहात राहणारे 6 विद्यार्थी करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे महापाकिलेच्या पथकाने या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील 48 विद्यार्थी व 3 शिक्षकांचे तातडीने स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहे. या एकावन्न जणांना अहवाल येईपर्यत वसतीगृहात होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच पॉझिटीव्ह विद्यार्थ्यांपैकी 5 जण होम आयसोलेशन मध्ये असुन 1 जणास गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार केले जात आहे.

वसतीगृहात संसर्ग झाल्यामुळे आता याठिकाणी असलेल्या 116 विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात येऊन वसतीगृह रिकामे करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना संसर्ग नेमका कसा झाला, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे आता शहरातील शाळांसह इतर वसतीगृह व्यवस्थापनांना सतर्क राहण्याच्या सुचना महापालिकेकडुन देण्यात आल्या असुन यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here