मुंबई (प्रतिनिधी) – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे येत्या दोन दिवसांत राजिनामा देण्याची शक्यता आहे. असे खात्रीलायक सुत्राकडून बुलंद पोलीस टाईम्सला माहिती मिळाली आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांनी काही मिनिटे भेट घेतली. त्या भेटीनंतर ते राजिनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. त्यांनी पुण्याला जावून घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांना खडे बोल सुनावत त्यांना जाब विचारला.
सोशल मिडीया स्टार पूजा चव्हाण हिची आत्महत्या झाल्यानंतर तिच्या आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या क्लिप व्हायरल झाल्यामुळे संजय राठोड हे अडचणीत आले आहेत. आणि हा पुरावा विरोधकांच्या आयता हाती लागल्यामुळे त्यांनी संजय राठोड यांच्या विरोधात राळ उठवायला सुरवात केली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जवळपास संजय राठोड हे १५ दिवस गायब होते. १५ दिवसांनंतर त्यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतले. आणि आपले शक्तीप्रदर्शन केले.
पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड यांनी तिथे एक पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आणि मला या प्रकरणात बदनाम करण्यात येत असल्याचे सांगितले. हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आणि जोपर्यत संजय राठेडला अटक होत नाही तोपर्यत आम्ही गप्प बसणार नाही, असे विरोधकांनी सांगितले आहे.






