नाशिक (विशेष प्रतिनिधी) – उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता हे कुणाला खरे वाटणार नाही. स्वा. विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. त्यांचा आज आत्मार्पण दिन. मात्र देशासाठी एवढे अमोघ बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे स्मारक मात्र आजही जिर्णोध्दाराच्य प्रतीक्षेत आहे.
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली.मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
नाशिकमधील तीळभांडेश्वर लेन येथील अभिनव भारत मंदिरात त्यांचे फार काळ वास्तव्य होते. या ठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांचे स्मारक केले आहे. परंतु ही वास्तू जीर्ण झाली असून त्यांचा जिर्णोद्धार गरजेचा आहे. या ठिकाणी सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मा.गो.कुळकर्णी यांनी चित्रीत केले आहे. हे सर्व चित्र, सावरकरांची हस्तलिखिते या वास्तूत आहेत. त्यामुळे या स्थळाचा जिर्णोध्दार करण्याची मागणी सावरकरप्रेमी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.






