चार राज्य, एका केंद्रशासित प्रदेश विधानसभा निवडणूक घोषणेची आज शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) – पश्चिम बंगालमध्ये ६ ते ८ टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. तर आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक पार पडू शकते. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणूक तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान पूर्ण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी पार पडेल. १ मे पूर्वी विधानसभा गठनाची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असेही म्हटले जातेय. ४ मेपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये १ मेपूर्वीच निवडणुका घेण्याचे नियोजन पूर्ण केल्याची शक्यता आहे.

तारखांच्या घोषणेअगोदर निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांचे दौरे केले आहेत. सध्या एक टीम पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बंगाल दौऱ्यावर असताना कायदे-व्यवस्थेसंबंधी प्रदेशातील अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली होती. यावर मुख्य सचिवांनी त्यांना निवडणुकांपर्यंत कायदे व्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आणण्याची हमी दिली होती.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे हे देखील निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. परंतु, करोना प्रोटोकॉल पाळून निवडणुका घेता येऊ शकतात, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here