मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. मराठवाडा, विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला.
अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार यांनी २०२०-२१ च्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. यावेळी विरोधी बाकांवर उभं राहून घोषणाबाजी केली. तसंच ‘दादागिरी नही चलेंगी’च्या घोषणा घेत भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘समतोल विकासाचा विचार करुन या सरकारने निधीचं वाटप केलं आहे का? मला या सभागृहाच्या नियमांनुसार बोलण्याचा अधिकार आहे. मराठवाडा, विदर्भ या राज्याचा भाग आहे. डावपेचात वैधानिक विकास मंडळं अडकता कामा नये. तुम्ही सभागृहातले शरद पवारांचं भाषण जाहीर वाचून पाहा. अजित पवारांनी १५ डिसेंबर २०२० ला आश्वासन दिलं होतं की, मी वैधानिक विकास मंडळं स्थापन करुन देऊ, त्याला ७२ दिवस झाले आहेत, ते करणार आहात की नाही ते सांगा, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.
त्यानंतर अजित पवार यांनी उत्तर दिले. ‘आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या मताचं आहे. ८ तारखेला बजेटमध्ये विकास मंडळांबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पाहायला मिळतील. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. १२ विधान परिषदेची नावं दिली आहेत. ज्या दिवशी ती नावं जाहीर केली जातील त्याचवेळी विकास मंडळं घोषित केली जातील’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.






