मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईतील वीज यंत्रणेवर चीनने सायबर हल्ला केल्याचा दावा धादांत खोटा असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्याच्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला होणं शक्यच नाही. कारण आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करत आहोत, असं ते म्हणाले.
मुंबईतील वीज यंत्रणेवर 12 ऑक्टोबर रोजी चीनने सायबर हल्ला झाला होता, असा दावा ऊर्जा आणि गृह विभागाच्या एका अहवालात करण्यात आला असला तरी तो धादांत खोटा असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आपले अपयश लपवण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी हे खोटे अहवाल एका आयपीएस अधिकाऱ्याकडून तयार करुन घेत राज्याच्या 12 कोटी जनतेची दिशाभूल केली, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
12 ऑक्टोबरच्या तीन दिवस आधीच मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार पैकी दोन लाईन्समध्ये बिघाड झाला होता. त्याकडे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, म्हणून मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या उर्वरित दोन लाईनवर दबाव वाढून त्याही बंद पडल्या. जर 12 ऑक्टोबरच्या आधी तीन दिवस ऊर्जा विभागाने लक्ष घातले असते तर मुंबईत वीज पुरवठा दिवसभर बंद पडला नसता असे ही बावनकुळे म्हणाले.






