शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – शिर्डी नगरपंचायतचे निष्क्रीय पदाधिकारी आपली निष्क्रीयता झाकण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे, साईभक्तांकडुन कर वसुली करून शिर्डीच्या जनतेला व साईभक्तांना लक्ष्य करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे.
शिर्डीच्या नागरीकांनी यापुर्वी महाराष्ट्र नगरपिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी आदि नियम १९६५ चे कलम १२७ अंतर्गत घरपट्टी, पाणी पट्टी, गाळा भाडे कमी करण्यासाठी कायदेशीर हरकती घेऊन विनंती केली होती. मात्र असा कायदाच नाही आम्हाला अधिकार नाही राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे अशी साळसुद भुमिका घेऊन त्याच कायद्याच्या आधारे खोटा पाहणी अहवाल तयार करून हॉटेल, दुकाने व अन्य व्यवसाय सुरू असल्याचे निर्लजपणे लेखी कळविले.
शिर्डीच नव्हे तर संपूर्ण भारत देश कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असतांना शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या नेत्याला शिर्डीत व्यवसाय चालु असल्याचे दिसत आहे. कारण त्यांचे नेते धृतराष्टां सारखे सत्तेच्या प्रेमापोटी आंधळे झाले आहेत. शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी सक्तीने घरोघरी जाऊन कर वसुली करत आहे. कर वसुली बरोबर दंड व व्याज आकारण्यात येत आहेत. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरीकांना आत्महत्येची वेळ आली आहे.
शिर्डी नगरीला वरील अत्याचार करून भागले नाही म्हणुन दि.०२/०३/२०२१ रोजी खोटी सर्व साधारण सभा घेऊन भक्तांवर टोलनाक्याच्या माध्यमातुन कर वसुली करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. मात्र अशी सभाच झालेली नाही कारण या सभेला ०६ (सहा) निवडुन आलेलेव ०२ (दोन) स्विकृत सदस्य उपस्थित होते. हे जर खोटे असले तर सत्ताधाऱ्यांनी या सेभेची चित्रफीत शिर्डीकरांना दाखवावी. गैरहजर नगरसेवकांच्या खोट्या सह्या घेऊन लुटमारीचा निर्णय घेण्यात आला आहे. या ना त्या मार्गाने पैसे वसुल करणे एवढाच सत्ताधारी व त्यांचे नेते यांनी एकमेव निर्णय घेतला आहे. या प्रवृत्तीचा आम्ही शिवसेनेच्या वतीने निषेध करीत आहोत.






