मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – जळगावमधीस महिला वसतिगृहात मुलींना नग्न करून नाचविल्याच्या बातमीमध्ये कोणतीही तथ्य नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ महिला अधिकाऱ्यांनी समिती नेमली होती. वसतिगृहातील ४१ महिलांच्या साक्षीनुसार या घटनेत तथ्य नाही, अशी बाब समोर आली आहे.
शहरातील गणेश कॉलनीतील आशादीप वसतिगृहात मुलींना नग्न करून त्यांना नृत्य करायला लावत असल्याच्या तरूणीच्या तक्रारीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रक्षिणार्थी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.त्यांनी वसतिगृहातील काही मुलींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, “या प्रकरणात ४ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. समितीने वसतिगृहातील ४१ महिलांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्यानुसार या तक्रारीमध्य तथ्य नाही. पत्नी वेडसर असल्याची पतीनं तक्रार केलेली होती. वसतिगृहात पोलिस हजर नव्हते”, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख यांनी पुढे सांगितले की, “घटनेवेळी वसतिगृहात महिलांचा गरबा सुरू होता. त्रास होत असल्याने महिलेनं झगा काढून ठेवला होता. पोलिसांनी व्हिडीओ काढला, यामध्ये काहीही तथ्य नाही”, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिली. यासंदर्भात यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “वसतिगृह चांगल्या ठिकाणी आहे. ‘त्या’ महिलेविरोधात खूप तक्रारी आहेत. या घटनेमध्ये वसतिगृहाची विनाकारण बदनामी झाली”, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.
गणेश कॉलनीतील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या आशादीप वसतिगृहातील घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानसभेत केली. संपूर्ण राज्यभरात वसतिगृहात घडलेल्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत होता.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीत महिला पोलीस अधिकारी कांचन काळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे आणि अन्य एक महिला स्त्रीरोग तज्ञ अशांचा समावेश आहे. वसतिगृहातील प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही समिती आज सकाळी १० वा. आशादीप वसतिगृहात पोहोचली. तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर सायंकाळी ७ वा. समितीच्या अध्यक्षा आणि सदस्य आशादीप वसतिगृहातून बाहेर पडले.
वसतिगृहातील प्रकरणाशी संबंधित तक्रारदार आणि इतर काही मुलींचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहे. आमची चौकशी अजून सुरू आहे ती पूर्ण झाली नाही. अजून काही मुलींचे जबाब घेणे बाकी आहे. चौकशी पूर्ण करून अहवाल लवकरात लवकर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती चौकशी समितीच्या अध्यक्षा तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.







