मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा धारावीत कोरोनाने शिरकाव केला होता. या काळात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं निधन झालं आहे.
कोरोना काळात सगळ्यात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यावेळी तत्कालीन धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांनी चोख कर्तव्य पार पार पाडले होते. धारावीमध्ये रमेश नांगरे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाच्या काळात नांगरे यांनी अतुलनीय काम केले होते. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला होता. जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद घेण्यात आली होती. रमेश नांगरे यांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
रमेश नांगरे यांनी 2 दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे रमेश नांगरे यांचं निधन झालं. नांगरे यांच्या निधनामुळे पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.






