पालिका रुग्णालयांतही मिळणार कोव्हॅक्सिन लस; लसीकरणाचा वेग वाढणार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईत फक्त राज्य सरकारच्या जे.जे. रुग्णालयात मिळणारी कोव्हॅक्सिन लस आता पालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रांवरही मिळणार आहे. उद्या हैदराबादहून कोव्हॅक्सिनसह पुण्याहून सिरम इन्स्टिटय़ुटच्या कोविशिल्ड लसीचे दीड लाख डोस येणार आहेत. यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. यामध्ये पालिकेच्या 24 लसीकरण केंद्रासह राज्य सरकारच्या 4 आणि खासगी 38 अशा 66 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. यामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यातील फ्रंटलाइन वर्कस आणि तिसऱया टप्प्यातील 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असणाऱयांना लस देण्यात येत आहे. तीन टप्प्यांतील लसीकरणात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस धरून पाच लाखांहून जास्त डोस देण्यात आले आहेत. लसीकणाचा वेग वाढण्यासाठी आगामी काळात लसीकरण केंद्रांची संख्या मुंबईत 100 हून जास्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.

मुंबईतील खासगी रुग्णालयांत 24 तास लसीकरण करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. केंद्राच्या आदेशानंतर याची तातडीने अंमलबजाकणी करण्यात येणार आहे. सध्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे पालिका आपल्या लसीकरण केंद्रावर 24 तास लसीकरण कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काकाणी म्हणाले की, ‘ज्या दिवशी जितक्या लाभार्थ्यांची नोंदणी झाली असेल त्या सर्वांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत संबंधित पालिकेचे केंद्र सुरू राहील.’ यामुळे कोणालाही एकाद्या दिवशी लस न मिळाल्यामुळे माघारी फिरावे लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here