पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भररस्त्यात ’वाजले की बारा’ ही लावणी सादर करत सोशल मीडीयावर रातोरात स्टार झालेले रिक्षाचालक बाबाजी कांबळे यांचे नशीब सध्या सातवे आसमान पे आहे. त्या व्हायरल नृत्यामुळे बाबाजी कांबळे यांना चक्क दोन सिनेमांची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात या रिक्षावाल्याच्या अभिनयाची जादूदेखील अनुभवता येणार आहे.
बाबाजी कांबळे हे बारामती तालुक्यातील गुनवडी या गावचे रहिवाशी आहेत. नुकतेच रिक्षात गॅस भरण्यासाठी ते पंपावर गेले होते. तिथे बराच वेळ लागणार असल्याने मोकळय़ा वेळेत त्यांनी ’वाजले की बारा’ या गाण्यावर भररस्त्यात लावणी सादर केली. त्यांच्या मित्रांनी हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजला. बाबाजी यांच्या नृत्याचे अनेकांनी कौतुक केले होते.
अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही त्यांची दखल घेतली होती. अखेर निर्माते-दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी बाबाजी यांना चक्क दोन चित्रपटांची ऑफर दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळत असल्याने बाबाजी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपण नक्कीच चांगले काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव लावणीवर डान्स करणाऱ्या ‘त्या’ रिक्षावाल्याचे रातोरात नशीब पालटले; आता करणार चित्रपटात काम






