अभिनेत्री गौहर खानवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री गौहर खानवर कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ती कोविडबाधित असतानाही सार्वजनिक परिसरांमध्ये फिरली. इतकेचं नव्हे तर त्यांनी चित्रीकरणांमध्येही भाग घेतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

११ मार्चला गौहर खानची कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर घरातच विलगीकरण पद्धतीने राहणे बंधनकारक होते. मात्र नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक परिसरात तिचा वावर सुरुच होता. महापालिकेच्या अंधेरी के-पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी १४ मार्चला सायंकाळी तिच्‍या घरी गेले. वारंवार विनंती करूनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. अखेर एका समाजसेवकाच्या मदतीने तिला विनंती केला केली असता, तिने दरवाजा उघडला. त्यानंतर विलगीकरणाचा शिक्का त्यांच्या हातावर नियमानुसार उमटविण्यात आला.

अखेर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी गौहर खान विरोधात पोलीस तक्रार दिली. भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार तिच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here