वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यामध्ये घडला हा प्रकार
अॅण्टीग्वा अॅण्ड बर्म्युडा – वेस्ट इंडीजच्या संघाने श्रीलंकन संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाच धावांनी पराभूत करत मालिका ३-० च्या फरकाने जिंकली. ब्रावोच्या शानदार शतकामुळे विंडीजला या सामन्यात सहज विजय मिळवता आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकन संघाने ५० षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाने दीड षटक शिल्लक असतानाच पाच गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकला. श्रीलंकाकडून हसरंगा डीसिल्वाने सर्वाधिक म्हणजेच नाबाद ८० धावा केल्या तर एशेन बंडाराने नबाद ५५ धावांची खेळी केली.
अॅण्टीग्वा अॅण्ड बर्म्युडा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानात खेळवण्यात आलेल्या या तिसऱ्या सामन्यादरम्यान मधमाश्यांनी मैदानावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. अचानक मैदानात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाश्या आल्या की खेळ थांबवण्यात आला. दोन्ही संघातील खेळाडू आणि पंचांनी मैदानावरच झोपून स्वत:ला मधमाश्यांपासून वाचवलं. नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच डावामध्ये श्रीलंकन संघ फलंदाजी करत असतानाच ३८ व्या षटकादरम्यान मोठ्या संख्येने मधमाश्या मैदानात आल्या. यावेळी हसरंगा सात तर एशेन बंडारा १९ धावांवर खेळत होते. अचानक मधमाश्यांची संख्या वाढल्याने खेळ थांबवून मैदानातील सर्वजण जमीनीवर झोपले. काही वेळाने मधमाश्या निघून गेल्यावर खेळ पुन्हा सुरु झाला. या मधमाश्यांच्या हल्ल्यात कोणीही गंभीर जखमी झालं नाही.
Bee 🐝 attack in #WIvSri#INDvENGt20 #Cricket pic.twitter.com/KgA5as5myR
— Cricket Scorecards (@MittiDaPutla) March 14, 2021
यापूर्वीही अशाप्रकारे मधमाश्यांमुळे क्रिकेटचा सामना थांबवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. शारजामध्ये अशाप्रकारे धुळीच्या वादळामुळेही एकदा सामना थांबवण्यात आला होता.
मालिकेतील या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवून श्रीलंकन संघ एखादा तरी सामना जिंकेल अशी अपेक्षा लंकन चाहत्यांना होती. मात्र विंडीज संघाच्या गोलंदाजीपुढे पाहुण्या श्रीलंकन संघातील आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. धनुष्का गुणतिलकाने ३६ आणि दिमुथ करूणारत्नेने ३१ धावा केल्या. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. ३२ व्या षटकामध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात श्रीलंकेची धावसंख्या १५१ इतकी होती. यानंतर सातव्या विकेटसाठी एशेन आणि हसरंगाने १२३ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. मात्र विंडीज संघातील ब्रावो, होप आणि पोलार्ड यांच्या खेळीच्या जीवावर सामना सहज खिशात घालत ३-० च्या फरकाने मालिका जिंकली. पुढील आठवड्यापासून हे दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.






