ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी काळे यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी तथा माई काळे (88) यांचे बुधवारी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाट्यकलावंत मंदार काळे यांच्या त्या मातोश्री होत.

दिवंगत संजीवनी काळे यांनी ललित कला मंदिर या संस्थेच्या अनेक नाटकांतून भूमिका केल्या. अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या नाटय़क्षेत्रातील सुरुवात विवाहापूर्वी कल्याण येथे असताना एका पुरुष भूमिकेने झाली. ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘दैवे लाभला चिंतामणी’, ‘मोरूची मावशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ (घालीन लोटांगण), ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पदरी पडलं पवित्र झालं’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या.

आरती हवालदार लिखित 16 स्त्री पात्रे व फक्त दोन पुरुष पात्रे असलेलं ‘चांगुणा’ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित करून विक्रम केला होता. पाठोपाठ ‘नामा सातपुते’, ‘दुबळा’, ‘एक होती वाघीण’, ‘47 एके 47’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शन व भूमिकाही त्यांनी केल्या.

डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘उंबरठा’ व ‘सुबह’ या अनुक्रमे मराठी व हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘हे झाड जगावेगळे’ या पांडुरंग काळे यांच्या नाटकाचे हिंदी रूपांतर त्यांनी केले आहे. त्याशिवाय राष्ट्रसेविका समिती, भारत स्काऊट आणि गाईड, योगासने वर्ग, नंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षण अशा माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here