नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी खेळी खेळली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या पाठोपाठ प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत भाजपात प्रवेश केला.
अरुण गोविल यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते बंगालमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत. अरुण गोविल बंगामध्ये जवळपास १०० हून अधिक प्रचारसभा घेतील असं सांगितलं जात आहे. अरुण गोविल यांचा पक्षप्रवेश झाला तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह उपस्थित होते.
यावेळी अरुण गोविल म्हणाले, ‘मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे’, असं म्हणतानाच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. ‘पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची ऍलर्जी झाली. जय श्रीराम फक्त एक घोषणा नाही’, असं ते यावेळी म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरामुळे देशभरात भाजपचं मोठं कौतुक केलं जात आहे, दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर हे ‘राम’ भाजपला पावणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अरुण गोविल यांनी हिंदी, भोजपूरी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. १९९१ मध्ये म्हणजेच तब्बल ३० वर्षांनी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती.






