नेमके अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष कोण?

पवारांचे पत्र मिळाले, पण तो अंतर्गत मामला – कांबळी गटाचा दावा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाचा गुंता काही सुटतांना दिसत नाही. नियामक मंडळाच्या सदस्यांनी बहुमताने नरेश गडेकर यांना हंगामी अध्यक्ष केलेले आहे. त्यामुळे प्रसाद कांबळी की गडेकर, की आणखी कुणी…नेमके नाटय़ परिषदेचे अध्यक्ष कोण? याबाबत संभ्रम आहे. अशातच तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी 18 फेब्रुवारीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना नाटय़ परिषदेला दिली आहे, असा दावा गडेकर गटाने केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बैठक पार पडून अध्यक्षपदाचा गोंधळ दूर होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

18 फेब्रुवारी रोजी प्रसाद कांबळी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी बहुमताने नरेश गडकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली, मात्र अद्याप त्यांच्याकडे परिषदेचा कारभार आलेला नाही. दुसरीकडे प्रसाद कांबळी यांनी घटनेनुसार आपण अध्यक्षपदावर असल्याचा दावा केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नियामक मंडळाच्या सदस्यांनी विश्वस्त शरद पवार यांना भेट घेतली. याविषयी गडेकर गटाचे प्रवक्ते भाऊसाहेब भोईर म्हणाले, काही गोष्टी मुख्य विश्वस्तांच्या कानावर गेलेल्या आहेत. नियामक मंडळाची बैठक घेण्याची मागणी आम्ही केलेली आहे. त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करून कळवतो असे त्यांनी सांगितले आहे.

शरद पवार यांनी नाटय़ परिषदेला बैठक घेण्यासंदर्भात पत्र दिले आहे का, याबाबत विचारणा केली असता प्रसाद कांबळी म्हणाले, विश्वस्तांनी प्रमुख कार्यवाह यांना पाठवलेला हा अंतर्गत पत्रव्यवहार आहे त्याबद्दल सांगता येणार नाही. तसेच तहहयात विश्वस्तांना योग्य माहिती देणे आमचे काम आहे. या दृष्टीने त्यांना नक्की भेटू, असेही कांबळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here