उत्तराखंडमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भयंकर स्फोट

रुडकी (उत्तराखंड) – येथील फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हा परिसर पुरता हादरून गेला होता. यामध्ये आणखी दोनजणं गंभीर जखमी झाले आहेत.

पिरान कलियर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान याठिकाणी कारखान्यास नव्हे तर केवळ गोदामासाठी परवाना मिळाला होता. तरी देखील फटाक्यांचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. यामध्ये भाजल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर मृतांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणच्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी देखील फटाक्यांचे गोडाऊन बनवले आहे, यावर अनेक वेळा पोलीस प्रशासनाने कारवाई देखील केली आहे. पण या गोदामांची संख्या काही कमी होत नाही. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, रुडकी याठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने पिरान कलियरमध्ये गोदाम बांधले आहे. गुरुवारी दिवसा कारखान्यात काम करत असताना स्फोट झाला. यामध्ये येथे काम करणाऱ्या चौघांपैकी दोघांच्या चिंधड्या उडाल्या. या दुर्घटनेमध्ये कारखाना आणि गोदाम देखील जळून खाक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here