नाशिक (विशेष प्रतिनिधी) – आदेशाची पायमल्ली करणार्या सिन्नर शहरातील कजरी मिठास या मिठाईच्या दुकानावर खुद्द जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कारवाई केली. हे दुकान सील करण्यात आले तर एका हॉटेलचालकाला दंड ठोठावल्याने शहरातील व्यावसायीकांमधे चांगलीच खळबळ उडाली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पुर्ण लॉकडाऊन न करता आरोग्य आणि अर्थचक्र सुरू राहण्यासाठी काही बंधने घालून आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. मात्र या सर्व ठिकाणी गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी मांढरे यांनी सिन्नरला भेट देत तहसिल कार्यालय येथे आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष शहरात फिरत परिस्थितीची पाहणी केली.
गंगावेस, भाजीबाजार, नेहरू चौक ते बस स्टँड असे पायी चालून भाजीबाजार आणि पेठेतील दुकानांची तपासणी केली असता कजरी मिठास या मिठाईच्या दुकानात कोरोना नियमाचे उल्लंघन करून विक्री सुरू असल्याचे दिसुन आल्याने हे दुकान सील करण्यात आले. तसेच जय मल्हार खानावळ येथे देखील कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने दंड व चौकशी चे आदेश दिले. याच परिसरातील सोनी वेयर येथे तपासणी करून लहान मुलांना विना मास्क दुकानात आणल्यामुळे मुलाच्या आईला 200 रुपये दंड करत विनामास्क व लहान मुलांना घेऊन येणार्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये अशा सूचना दुकांदारास दिल्या.
सर्व हॉटेल मालकांनी त्यांच्या हॉटेल मधील 50 टक्के टेबल काढून टाकणे आवश्यक असल्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिले. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी रोज तपासणी करत धाडी टाकून कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे उपस्थित होते.
तहसील कार्यालय येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला ,सिन्नर शहर आणि तालुक्यात वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय झाला आहे. त्यासाठी बंधन पाळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागून त्याचा त्रास सर्वांना होईल. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात अश्या सूचना यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिल्या. तसेच इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरला भेट देत पाहणी केली.






