कल्याण-डोंबिवली महापालिकेचा १७०० कोटींचा अर्थसंकल्प सादर

  • ‘केडीएमटी’साठी अर्थसंकल्पात १०५ कोटींची तरतूद
  • यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन काय?
  • करदात्या नागरिकांना काय मिळणार?

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आरोग्य सुविधांवर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या वर्षी जमेची १७०० कोटी रुपयांची बाजू अपेक्षित धरून १६९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. हा महापालिकेचा अर्थसंकल्प अत्यंत वास्तववादी असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

दि. ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. सदस्य मंडळाची मुदत संपल्याने हा अर्थसंकल्प स्थायी समिती व त्यानंतर महासभेला सादर केला जाणार नाही. महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी बुधवार, दि. २४ मार्च रोजी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.

चालू वर्षीच्या तुलनेत ६७४ कोटींनी कमी असलेला अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने महापालिकेकडे ६५ बेडची व्यवस्था होती. कोरोनामुळे बेडची व्यवस्था वाढविण्यात आली असून, आजमितीस ५८६७ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या कालावधीत आतापर्यंत कोरोना ‘पॉझिटिव्ह’ ६७ हजार १९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातून ६२ हजार ९०८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी साधारणत: ३० हजार २५६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात कोरोनाला रोखण्यासाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेची 15 नागरी आरोग्य केंद्र असून, ‘आपला दवाखाना’ या थीमच्या आधारे २५ दवाखाने उभारण्याचा मानस आहे. टिटवाळा आणि वसंत व्हॉली येथे नवी रुग्णालये उभारली आहेत. कल्याण आणि डोंबिवलीत प्रत्येकी दोन याप्रमाणे चार डायलिसीस केंद्र उभारण्यात येणार आहेत. कॅथ लॅब, मॉड्युलर ओटी, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी सुरू केली जाणार आहे. यातून आरोग्य व्यवस्था बळकट केली जाण्याचा महापालिकेचा मानस आहे. मागील वर्षी एक हजार ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना जवळपास २०० कोटी रुपयांच्या खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे. अनावश्यक कामांना कात्री लावून कोणतीही विकासकामे प्राधान्यक्रम ठरवून केली जाणार असल्याने हा अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाचा १०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पदेखील महापालिका आयुक्तांनी बुधवारी सादर केला. ‘केडीएमटी’च्या अर्थसंकल्पात १०३ कोटी रुपयांचा खर्च तर दोन कोटी ४० लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आल्याने हा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. परिवहन सेवेतील ५२ बसेसचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. ६९ बस दुरुस्तीसाठी खर्चिक असल्याने १२१ बस काढून टाकण्यात येणार आहेत. ‘लॉकडाऊन’ काळात प्रवासी भारमान घटल्याने यंदा १३७ बसेस चालविण्याचे नियोजन आहे. महिलांसाठी चार तेजस्विनी बस चालविण्यात येणार आहेत. प्रवासी वाहतुकीतून ३० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. इतर मिळकतीतून 15 लाख मिळणार आहेत. जाहिरातीतून एक कोटी ५५ लाख मिळणे अपेक्षित धरण्यात आले आहे. ‘केडीएमटी’च्या बसेसने पोलिसांकडून दोन कोटी ७० लाख मिळण्याचे गृहित धरण्यात आले आहे. लग्नसमारंभ आणि खासगी कार्यक्रमासाठी बस आरक्षित केल्यास दोन लाख उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसुली खर्च 86 कोटी, वाहन दुरुस्तीसाठी १७ कोटी ८० लाख, इंधनखरेदीवरील खर्च १९ कोटी ६५ लाख अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच प्रवासी भाड्यात सुसूत्रीकरण आणले जाणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात नागरी सोयी-सुविधा सिटिझन फ्रेंडली करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. यंदा ‘थिंक टॅक स्कीम’ ही नवी संकल्पना वापरण्यात येणार आहे. शहरात विविध प्रकल्प राबविले जातात. त्या शहरातील विविध समस्या सोडविण्याकरिता समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे विचार गट तयार केले जातील. त्याला ‘थिंक टॅक स्कीम’ असे आयुक्तांनी संबोधले आहे. या स्कीमचा आधार घेऊन शहरातील विविध समस्या सोडविण्यात येणार आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरात शून्य कचरा मोहीमेतून कचर्‍याचे वर्गीकरण केले जात आहे. नागरिकांना कचरामुक्त शहर देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. शहरात ‘एलईडी’ दिवे लावून विजेची बचत केली जाणार आहे. नागरी सुविधा केंद्र स्मार्ट बनविण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. शहरातील रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. स्टेशन परिसरातील ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ‘सीसीटीव्ही’ आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. सिटी पार्क आणि काळा तलावाचा विकास करण्यात येणार आहे. शहरातील उद्याने विकसित केली जाणार आहेत. उद्यानांच्या विकासासाठी दोन कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील नदीकिनारा आणि उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर भर देऊन उल्हास नदीच्या किनार्‍याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ‘पीपीपी’ तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहाचे काम सुरू करण्यात येणार आहे. दुर्गाडी परिसरात ‘नौदल आर्ट गॅलरी’ उभारण्यात येणार आहे. महापालिका कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर यंदा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रिक प्रणाली व सेवापुस्तिकांचे ‘डिजिटायझेशन’ केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here