नांदेड – जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र मागील काही दिवसात करोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या मृत्यूंमुळे मृतांच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी बारा-बारा तास वाट पाहावी लागत आहे.
करोना आजारामुळे आता मृत्यूची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला. शहरातील मृत रुग्णांचा गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांग लागली होती. अक्षरशः स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली.
वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने टाळेबंदी घोषित केली आहे. २४ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत ही टाळेबंदी असणार आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.






