कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूरकर सरसावले; ‘विकेण्ड लॉकडाऊन’ची कडकडीत अंमलबजावणी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत असून, संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 पासूनच सर्व दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. शनिवारी व रविवारी सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. आज सकाळपासून बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. ग्रामीण भागातही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी दुपारनंतर नागरिकांची तुरळक वर्दळ दिसून आली.

सोलापूर शहर व जिह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवारी सर्व व्यवहार व आस्थपना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आज सकाळपासूनच नवी पेठ, चाटी गल्ली, बेगम पेठ, अशोक चौक, मधला मारुती, कुंभार वेस, जोड बसवणा चौक, विजापूर रोड, अक्कलकोट, केतिम चौक, मार्केट यार्ड परिसरातील सर्व दुकाने, रेस्टॉरंट बंद होते. त्याचप्रमाणे धार्मिळ स्थळेही बंद होती. सकाळी कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मार्केटमध्ये तुरळक गर्दी जाणवली. अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर व जिल्ह्यातही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अक्कलकोट, दुधनी, येथेही सर्व व्यवहार बंद आहेत. रेस्टॉरंट, टपऱ्या, हातगाडय़ा बंद असल्यामुळे दररोज आढळणारी प्रमुख चौकातील गर्दी दिसून आली नाही. दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक वर्दळ दिसून येत होती. अक्कलकोट शहर व तालुक्यातील जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असल्याने शहरात शुकशुकाट दिसत होता. नातेपुते येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

सोलापूर जिल्हय़ातील काही गावांमध्ये आज आठवडे बाजारसुद्धा बंद ठेवण्यात आला होता. दवाखाना, मेडिकल दुकान, वृत्तपत्र वितरण आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एस. टी. आगाराने ग्रामीण भागातील 50 टक्के एसटी सेवा बंद ठेवली होती. लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरू होत्या, परंतु प्रवासी तुरळक दिसून येत होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे रस्त्यावरून ध्वनिक्षेपकाद्वारे बंद ठेवण्याचे आवाहन करताना दिसून आले. येत्या दोन दिवसांत रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आढळले. शहरात आज साठजणांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे 15 हजार 500 रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here