करोनाग्रस्त वृद्धाची रुग्णालयातच आत्महत्या

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या ४ दिवसांपासून गजभिये यांच्यावर उपचार सुरू होते. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना येण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यासोबत कोण होते व त्यांना येथे कोणी दाखल केले याचा शोध पोलीस घेत आहेत. मेडिकलच्या कागदपत्रात त्यांचा पत्ता रामबाग असा देण्यात आला आहे. रामबाग हा या हॉस्पिटलला लागून असलेलाच भाग आहे.

सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. तेथील सफाई कर्मचारी बाथरुममध्ये गेला असता गजभिये यांनी ऑक्सिजन मास्कच्या वायरनेच गळफास लावल्याचे आढळून आले. वायरचा एक भाग त्यांनी तेथील एक्झॉस्ट पंख्याला बांधला होता. सफाई कर्मचाऱ्याने मेडिकल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच अजनी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. रुग्णाला कोणी आणले, त्याचे नातेवाईक कोण, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जभिये यांना २६ मार्च रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर ‘सुसाइड नोट’ आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here