नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आजपासून होम क्वारंटाईन राहणार असून पुढील सहा दिवस ते घरातूनच महापालिकेचा कारभार हाकणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: पत्रकारांना दिली.
महापालिकेचे आयुक्त जाधव यांच्या पत्नी करोना बाधित आढळून आल्या आहेत. यामुळे जाधव उद्यापासून पुढील काही दिवस घरून काम करणार आहेत. ते म्हणाले, माझी स्वत: करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, खबरदारी म्हणून पुढील काही दिवस घरूनच काम करणार आहे.
नाशिकमध्ये सध्या करोनाची स्थिती बिकट आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच चालले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील करोनाची परिस्थितीचे वेळोवेळी माहिती घेऊन निर्णय घेणारे आयुक्तच आता घरून काम करणार असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आधीच करोनाबाधित झाल्यामुळे करोनाचा अधिक वाईट परिणाम सध्या महापालिकेला सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.






