ठाण्यातील १.३७ कोटींचा दरोडा उघडकीस; ठाणे पोलिसांची धडक कारवाई

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वारीमाता गोल्ड या ज्वेलर्स दुकानातून जानेवारीमध्ये तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पटना येथून विमानाने मुंबईत आलेल्या तीन आरोपींना कासारवडवली पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. मुळचे झारखंडचे असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. शिवाय आरोपींचा पुण्यातही ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करण्याचा डाव होता. त्यासाठी ते आले होते. मात्र वेळीच पकडले गेल्याने पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात जानेवारीत वारीमाता गोल्ड ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. या दरोड्यात चोरट्यांनी १ कोटी ३७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरले होते. या दरोड्याच्या घटनेचा तपास सुरू होता. ठाणे पोलिसांनी पाटणा येथून विमानाने मुंबईत आलेल्या तिघांना विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, या दरोड्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मूळचे झारखंडचे आहेत. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सर्व पोलिस ठाण्याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांना सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख हे तीन आरोपी पटना येथून विमानाने मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी मुळचे झारखंडचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात या तिघाही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, ही बाबही चौकशीत समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here