औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त बनत चालला असून कोरोना रोखण्यासाठी मास्क हीच खरी लस असे गृहीत धरून प्रशासन मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना देत असताना अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. बुधवारी शहरातील दुकानांवर व इतरत्र विनामास्क फिरणाऱ्या 32 जणांविरुद्ध बदनापूर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून 4 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे. तर 7 वाजेनंतर व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस व नगर पंचायत प्रशासनाने दिला आहे.
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रशासन खबरदारी घेत असताना अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र या सूचनांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 10 मार्च रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायती यांना आदेश बजावून जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व आस्थपना, दुकाने सायंकाळी 7 वाजेनंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दुकानात मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक करण्यात आला आहे. विनामास्क आढळून आल्यास तात्काळ दंड आकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी बिनवडे यांचे आदेश प्राप्त होताच बदनापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांच्या आदेशानुसार 31 मार्च रोजी पथक बनवून रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. बदनापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आदेशाची अंमलबाजावणी शहरात सुरू केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थपना, दुकाने वगळता इतरांनी दुकाने सायंकाळी 7 वाजेनंतर सुरू ठेवल्यास प्रथम दंड व दुसऱ्यांदा आढळून आल्यास दुकाने पुढील आदेशपर्यंत सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.






