ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रावरचं संकट अधिक गहिरं झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात नाईट कर्फ्यूबरोबर विविध जिल्ह्यात उपाययोजना केल्या जात आहेत. काही ठिकाणी दुकानांना वेळेची मर्यादा लावण्यात आली आहे. तर काही ठिकाणी इतर उपाय योजना केल्या जातायत. मात्र ठाण्यात उपाययोजनांना कंटाळून मद्यविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीच एक निर्णय घेतलाय. व्यापाऱ्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत. ठाण्यातही रुग्ण वाढीचे प्रमाण पाहताजिल्हा प्रशासनानं सायंकाळी 8 नंतर लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र याच्या विरोधात हॉटेल आणि रेस्तरॉ मालक तसेच संघटना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रात्री आठनंतर लावलेल्या लॉकडाऊनमुळं व्यवसायावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळं खर्चही निघत नसून तोटा होत असल्याचं हॉटेल रेस्तरॉ मालक चालक यांचं म्हणणं आहे. त्यामुळं याला विरोध करताना संपूर्ण ठाण्यात मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यापाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याच्या सर्व हद्दीत हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. रात्री 8 नंतरची बंदी उठवावी आणि एक्साईज फी भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संघटनांनी केलीय. या मागण्या मान्य होईपर्यंत मद्यविक्री पुन्हा सुरू करणार नसल्याचा इशारा व्यावसायिकांनी दिलाय. ठाणे जिल्ह्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण यामुळं प्रशासनाला लॉकडाऊन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करावे लागतायत. मात्र आता प्रशासन आणि व्यावसायिक समोरा-समोर उभे ठाकल्यानं या तिढा वाढणार अशी शक्यता निर्माण झालीय.






