श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या काकापोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाने तीन आंतकवाद्यांना घेराव घातला असून त्यापैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. या भागात अजूनही दोन दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. सकाळची वेळ असल्याने लोकांना घराचे दरवाजे व खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन लष्कराकडून केलं जात आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा परिसरातील समबोरा गावात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. गुप्त माहितीनंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम सुरू केली असता, पकडल्या जाण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान दहशतवाद्यांना शरण येण्यासही सांगितलं गेलं. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. यानंतर भारतीय सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आहे.
आतापर्यंत या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे, तर दोन दहशतवादी सतत गोळीबार करत आहेत. गेल्या काही काळापासून सतत होणाऱ्या गोळीबारावरून असा अंदाज लावला जात आहे, की संबंधित दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात गोळ्या उपलब्ध आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. यामध्ये भारतीय लष्कराची कोणतीही जीवितहानी झाली नाही.






