शिर्डीतील श्री साईबाबांचे मंदिर ३० एप्रिलपर्यंत साईभक्तांना दर्शनासाठी राहणार बंद

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणा-या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोवीड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांच्य प्रमुखांची उपस्थिती होती. साईसंस्थानच्या इतिहासात कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिस-यांदा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. १९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदीर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले. तसेच शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलीसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले.

यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० रोजी दुपारी तीन वाजेपासून १५ नोव्हेंबर २०२० रात्री पर्यंत मंदीर बंद ठेवण्यात आले. वाघा आज पाच एप्रिल रात्री आठ वाजेपासून ३० एप्रिल पर्यंत श्री साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, राज्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे हे भक्तांना दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, त्यानुसार शिर्डीचे श्री साईबाबांचे मंदिरही या कालावधीत साई भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, त्यामुळे साईभक्तांनी शिर्डीला येण्याचे टाळावे. तसेच श्री साईबाबांचे घरबसल्या ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन आता करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here