पालकमंत्र्यांनी जामनेरातच घेतला रेमडेसिवीरचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’

  • पुरेशा प्रमाणात इंजेक्शन्स उपलब्ध ; पाच हजारांचा साठा लवकरच येणार !
  • रूग्णांना सर्वतोपरी सहकार्य करणार : ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – आ. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट त्यांच्याच मतदारसंघात जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट देऊन याबाबतचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केला. यात तेथे पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. तर जिल्ह्यातही पुरेसा साठा असून लवकरच पाच हजार इंजेक्शन्स येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तर रूग्णांना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

या बाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यात जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असतांनाच वैद्यकीय सुविधेचा बोजवरा उडालेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील कोरोना बाधीत रूग्ण हे कोविड केअर सेंटरमधून पळून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तर, यानंतर एकाच दिवशी तब्बल १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने येथील परिस्थिती अतिशय भयावह बनल्याची स्थिती जगासमोर आली होती. तर कालच आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कृत्रीम टंचाई निर्माण केल्याने याचा तुटवडा भासत असल्याचा आरोप केला होता.

mla-gulabrao-patil

या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट दिली. त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालय आणि दोन खासगी रूग्णालयांमधील कोविड सेवेचा आढावा घेतला. यात त्यांनी झाडाझडती घेऊन दर्जेदार रूग्णसेवा करण्याची तंबी दिली. अनेक खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैशांची आकारणी करण्यात येत असतांनाच रूग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी याबाबत संबंधीतांना निर्देश दिले.

याप्रसंगी काही रूग्णांच्या आप्तांनी येथे चांगली सुविधा मिळत नसल्याचे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी संबंधीतांना तातडीने चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, कोविडच्या आपत्तीमध्ये घेण्याची नव्हे तर देण्याची वेळ आहे. यामुळे आपण एकमेकांना मदत करणे हीच खरी आजची गरज आहे. डॉक्टर्स व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्यसेवा ही मानवी सेवा व ईश्‍वर सेवा असल्याचे समजून काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, जामनेर येथे रेमडेसिवीरचे पुरेसे इंजेक्शन उपलब्ध आहेत. येथील शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रूग्णालयात देखील सध्या एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध असून लवकरच पाच हजारांचा स्टॉक दाखल होणार आहे. यामुळे रेमडेसिवीर हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी दिली.

याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, तालुका’ वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे, तहसीलदार शेवाळे, ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ अन्सारी, डॉ, वैभव अग्रवाल, डॉ सिसोदिया, पहूर येथे माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, डॉ हर्षल चांदा यांच्या सह आरोग्य कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. रूग्णांना सर्वतोपरी सेवा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

gulabrao-patil

या आरोग्य सुविधा तात्काळ पुरविण्याचे निर्देश
जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात १० किलो लीटर क्षमतेचा ऑक्सीजन टँक, ६ ड्युरा सिलेंडर, १०० ऑक्सीजन सिलेंडर, १० ईसीजी मशिन्स, २० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर, ५० मल्टी पॅरा आणि सेंट्रल मॉनिटरींग सिस्टीमची आवश्यकता आहे. तर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात ३ किलो लीटर क्षमतेचा ऑक्सीजन टँक, ३ ड्युरा सिलेंडर, ५० ऑक्सीजन सिलेंडर, ५ ईसीजी मशिन्स, १० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर, ३० मल्टी पॅरा आणि सेंट्रल मॉनिटरींग सिस्टीमची आवश्यकता असून याचा तातडीने पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here