केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल; राज ठाकरेंचे भाकित खरं ठरणार?

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई हायकोर्टाच्या सीबीआय तपासाच्या निकालानंतर अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. पण देशमुखांवर झालेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, असा ठपका ठेवत हायकोर्टाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे, ज्यात त्यांनी केंद्र सरकारकडून चौकशीची मागणी केली होती. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असं भाकीत राज ठाकरेंनी केलं होतं.

अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिलं होतं, असं आरोप करणारं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपनंतर राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन तपास करावा, केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे निलंबित होते. त्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह होता. शिवाय वाझे शिवसेनेतही होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी घनिष्ट मित्र आहेत. याच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. ही स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोपही होतो. मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली म्हणूनच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी. कारण याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही आणि जशी चौकशी योग्य प्रकारे झाल्यास फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल’, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here