यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या… – कंगना राणावत

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट निलंबित API सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत कंगना राणौतने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020 मधील तिचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा टॅग करत कंगनाने ट्विट केले आहे. यामध्ये ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय-काय होते…’, असे म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे असा हॅशटॅग जोडला आहे.

दरम्यान, कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020 मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळेच आता राजीनामा दिल्यानंतर कंगनाने अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here