मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे, यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे राज्यातील काही ठिकाणी लस पुरवठा संपल्याकारणाने लसीकरणाची मोहीम आणि केंद्र बंद करण्यात आले आहे.
राज्यात सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या कोरोना लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारमधील काही नेतेमंडळींकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. कोरोना लसींचा महाराष्ट्राला अपुरा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा आरोप फेटाळून लावला आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरु होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.






