कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर)-कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल व्यावसायिकांनी काल गुरुवारी राज्यभर आंदोलन पुकारले.होते युनायटेड हॉस्पिटॅलिटी फोरम ऑफ महाराष्ट्र या छत्राखाली त्यांनी आंदोलन पुकारले होते. या छत्राखाली सर्व हॉटेल संघटना एकत्र आल्या होत्या त्यांनी मिशन रोजी रोटी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे.

नव्याने लागू केलेल्या निर्बंधानुसार हॉटेल चालकांना घरपोच पार्सल सेवा पुरवता येईल मात्र या पार्सल सेवेतून केवळ ७ टक्केच फायदा होतो. त्यासाठी सरकारने पाणी पट्टी, विजेचे बिल, जागेचे भाडे, उत्पादन शुल्क आदी माफ करावे, अशी हॉटेल चालकांची मागणी आहे.

‘शनिवार- रविवार या महत्त्वाच्या दिवशी संचारबंदी असल्यानं या व्यवसायाचं मोठं नुकसान होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. पदार्थ घरपोच देणे हे आदरातिथ्य क्षेत्राचं काम नाही. या सेवातून केवळ ७ ते ८ टक्के उत्पन्न मिळू शकते. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवायचे असतील तर वीज देयक, पाणी देयक, जागेचं भाडं, उत्पादन शुल्क व इतर शुल्कही माफ करावे’, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनीही शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून ‘हे निर्बंध नसून टाळेबंदीच आहे. गेल्या टाळेबंदीत आमचे क्षेत्र १० महिने पूर्णत: बंद होते. त्या वेळी सरकारनं कोणतीही सवलत दिली नाही. राज्यभरात १० हजार ५०० हॉटेल, २ लाख १० हजार रेस्टॉरंट तर ३० लाख कर्मचारी आहेत. त्यामुळे या क्षेत्रांचे होणारे नुकसान सरकारने गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे’, असं त्यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here