महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात करोनाचा कहर वाढत असून पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधत तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची शिफारस केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही चालू आहे…म्हणजेच लॉकडाउन”.

“कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतू जेव्हा आपण जेव्हा अशाप्रकारे लॉकडाउन करतो, लोकांचा रोजगार जातो तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. याचं मात्र सरकारला कुठेही भान दिसत नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ती तातडीने लागू केली जाणार नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केल्याने लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here