मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत कोटय़वधी रुपये किमतीचा कोकेन आणि एमडीचा जप्त केला. या कारवाईत तिघा ड्रग्जमाफियांना बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत.
टांझानिया येथील ड्रग्ज तस्कर आग्रीपाडा येथे कोकेनचा साठा विकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळताच आझाद मैदान युनिटचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे, एपीआय सचिन कदम, उपनिरीक्षक मानसिंग काळे आदींच्या पथकाने आग्रीपाडय़ातील डॉ. मालमिया मार्गावर सापळा रचला. ड्रग्ज तस्कर डॅझी एमसुकू हा तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या अंगझडतीत 600 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा सापडला.
1 कोटी 80 लाख रुपये किमतीचा हा कोकेन असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, कुर्ल्याच्या सीएसटी रोडवर असलेल्या फितवाला कंपाऊंड येथे दोघे ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा विकण्यासाठी येणार असल्याचे समजताच वरळी युनिटचे प्रभारी निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एपीआय सुदर्शन चव्हाण व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. तेव्हा तेथे सईदू शेख (35) आणि अहमद शेख (37) हे दोघे तेथेच येताच त्यांना पकडले. दोघांकडे तीन लाख रुपये किमतीचा एमडीचा साठा सापडला.






