चेन्नई – श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवर अॅन्जिओप्लास्टी झाली असून सोमवारी त्याला चेन्नईच्या सिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ८०० विकेट घेणारा मुरलीधरन आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाला मार्गदर्शन करत आहे.
या स्पर्धेसाठी तो भारतात आला होता. मात्र, रविवारी त्याच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाली. ‘मुरलीधरनवर काल यशस्वी अॅन्जिओप्लास्टी झाली. आता त्याला डिस्चार्ज मिळाला असून तो पुन्हा त्याची कामे करू शकणार आहे,’ असे अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. मुरलीधरनला आता ७ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असून त्यानंतर तो पुन्हा सनरायजर्स हैदराबादच्या बायो-बबलमध्ये दाखल होईल.
मुरलीधरन हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १३४७ विकेट घेतल्या आहेत. त्याने श्रीलंकेकडून १३३ कसोटी, ३५० एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळताना अनुक्रमे ८००, ५३४ आणि १३ विकेट घेतल्या. तसेच १९९६ वर्ल्डकप विजेत्या श्रीलंकन संघात त्याचा समावेश होता. तो २०१५ पासून आयपीएल संघ सनरायजर्स हैदराबादला मार्गदर्शन करत आहे.






