दमिश्क – सीरियाचे राष्ट्रपती बसर अल असद सरकार यांच्या सरकारचे समर्थन करणाऱ्या रशियाने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. रशियन हवाई दलाच्या कारवाईत कमीत कमी २०० दहशतवादी ठार झाले आहेत. रशियन हवाई दलाच्या लडाऊ विमानांनी पलमायरातील उत्तर-पूर्व भागातील आयसिसच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागली. सीरियात रशियन सैन्याचे नेतृत्व करणारे रिअर अॅडमिरल अलेक्झेंडर कारपोव यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कारपोव यांनी सांगितले की, पलमायरातील उत्तर-पूर्व भागात दहशतवाद्यांनी तळ निर्माण केला असल्याची माहिती रशियन सैन्याला मिळाली होती. या ठिकाणांहून दहशतवादी हल्ले करण्यासाठी स्फोटके आणि घातक शस्त्रे इतरत्र पाठवत होते. सॅटेलाइट आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनंतर रशियन एअरोस्पेस फोर्सने या ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
रशियन हवाई दलाच्या हल्ल्यात दोन शेल्टर्स, जवळपास ५०० किलो दारूगोळा आणि स्फोटक उपकरणे उद्धवस्त करण्यात आली. त्याशिवाय २०० दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. रशियन अॅडमिरल यांनी दावा केली की, २६ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीआधी देशात अस्थिरता निर्माण करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. त्यासाठी विविध सरकारी संस्थांवर दहशतवादी हल्ले करण्याचे नियोजन करण्यात येत होते.






