विदारक… रुग्णांच्या नातेवाईकांवर आली ऑक्सिजन सिलेंडर चोरण्याची वेळ

दमोह (मध्यप्रदेश) – येथील पोटनिवडणुकीनंतर कोरोना संक्रमणाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, सामान्य माणूस ऑक्सिजन लुटण्यासाठीही मागेपुढे पाहत नाही आहे. आणखी चिंताजनक बाब म्हणजे याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांच्या बेजाबदार वागण्याला कंटाळून डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफ काम थांबवण्याची धमकी देत आहेत.

एकंदरित दमोह मधून समोर येणारी चित्रं चिंता वाढवणारी आहे. रात्रीच्या वेळी ऑक्सिजन स्टोअर रूममधून रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलेंडरची लुटमार करतानाचे हे चित्र काळजात चर्रर करणारं आहे. हा प्रकार दमोहमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात घडला. याठिकाणी कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याशी लढणाऱ्या लोकांची कुटुंबं ऑक्सिजन सिलेंडर मिळावा याकरता लुटमार करत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात अशाप्रकारे सिलेंडरची लूट सुरू आहे. या लुटमारीमुळे कोव्हिड वॉर्डांमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लोकांच्या हे लक्षात येत नाही आहे की त्यांच्या या चुकीमुळे कदाचित त्यांच्या माणसाचा जीव वाचेल पण त्यामुळे आयसीयू वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रूग्णांच्या जीवावर परिणाम होऊ शकतो. मंगळवारी रात्री उशिरा देखील अशीच लूट केली गेली. शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांनी पॅरा मेडिकल स्टाफ, इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याबरोबर गैरवर्तन देखील केले. या सर्व गोंधळानंतर नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांना पुन्हा काम सुरू करावं लागलं. पण यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

दरम्यान आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, भीतीपोटी सिव्हिल सर्जन्सनी काम थांबवण्याची धमकी दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी अशी माहिती दिली आहे की या घटनेनंतर अशाप्रकारे लूटमार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here