पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामधील एका हॉटेलमधील पार्किंग भागात स्फोट झाला. या स्फोटात चार जण ठार झाले आहेत. तर, १३ जण जखमी झाले आहे. बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक ताहिर राय यांनी या घटनेला दुजोरा दिला. स्फोट झालेल्या हॉटेलमध्ये चिनी राजदूत आपल्या शिष्टमंडळासोबत थांबले होते. मात्र, स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते. हा आत्मघाती हल्ला होता.

क्वेटा पोलीस महासंचालक अजहर इकराम यांनी सांगितले की, स्फोटके एका कारमध्ये ठेवण्यात आली होती. मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. हा स्फोट रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. स्फोटानंतर पोलिसांनी या संपूर्ण भागाला घेरले होते. बॉम्बविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये जवळपास ८० ते ९० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये बॉल बेअरिंग आणि सी४ एक्सप्लोसिव्हचा समावेश होता.

या स्फोटानंत बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह लैंगोव यांनी सांगितले की, या भागात दहशतवाद सातत्याने वाढत आहे. आमचेच लोकं अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यात सहभागी आहेत. या हल्ल्याबाबत आधी कोणताही इशारा गु्प्तचर यंत्रणेकडून देण्यात आला नव्हता. चिनचे राजदूत सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी सांगितले की, या हल्ल्याच्या उच्चस्तरीय तपास केला जात आहे. या हल्ल्यात सामिल असलेल्या दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल. या हल्ल्यात पाकिस्तानच्या शत्रुंचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here